गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

हा मृत्यू नैसर्गिक नाही ………. !

                                हा मृत्यू नैसर्गिक नाही ………. !

           मानवी कृरतेच्या  परीसिमांबद्दल आपण रोज इतके ऐकतो कि , कधी काळी  अपघातांच्या बातम्यांनी हादरणारे आपण हल्ली असल्या बातम्या वाचून निवांत पेपरचे पान पुढे सरकवतो किंवा चानेल बदलतो . पंधरा दिवसांपूर्वी एका एस . टी . ड्रायवरने कुत्र्याला  धडक मारली आणि तो निघून गेला ; न थांबता ! मला या घटनेबद्दलची माहिती देणारा एक फोन आला तेव्हा मी शिकवणी घेत होतो . मी उदास झालो . शिकवणी थांबवून मुलांना घडलेला प्रसंग सांगितला . मुलेसुद्धा भावूक झाली . माझ्याबरोबर येतो म्हणाली पण मीच त्या अपघात स्थळावर जाऊ शकत नव्हतो . कारण फोन करणा-याने मला कुत्रे मेल्याचे सांगितले होते . मला असली दृश्ये बघणे  सोसत नाही . म्हणून मी लांबूनच बघून काय करता येईल याचा विचार करू लागलो होतो . पण मला थारा होईना . कारण जर रस्त्याच्या मध्ये कुत्रे पडले असेल तर अजून लोक त्याच्या अंगावरून गाडी घालत बेफामपणे जाणार हे मला ठाऊक होते . कित्येकदा अचानक रस्त्यावर कुठला तरी प्राणी किंवा पक्षी वाहनाच्या धडकेत मारून पडून व त्याच्या अंगावरून वाहने जाउन तो रस्त्याला चिकटलेला मी पहिला आहे . म्हणून मी तिथे जायचे ठरवले . त्याच्या शरीराची अजून लक्तरे उडू नयेत म्हणून मी गेलो . जाऊन बघतो तर कुत्रे गोल होऊन पडले होते . मला भयंकर राग आला मी बस नियंत्रक अधिकार्याला फोन केला आणि खूप बोललो . ' मला त्या जबाबदार ड्रायवरला भेटायचे आहे ; आणि तुम्ही मला त्याची माहिती काढून द्या ' म्हणून सांगितले . गाडीच्या ड्रायवरला शिक्षा झालीच पाहिजे असे मी त्यांना सांगितले . त्याचबरोबर गाड्या हळू आणि काळजीपूर्वक  हाकण्याच्या कार्यशाळेचे नियोजन करा म्हणून सांगितले . ते काहीच इतर बोलले नाहीत फक्त 'हो ' म्हणाले . मी प्रचंड रागाने थरथरत होतो . मी ग्रामपंचायतीच्या ट्राक्टरला फोन करून बोलावून घेतले . ते १० मिनिटांत आले . मग त्यांनी ओढत त्या कुत्र्याला ट्राक्टरमध्ये चढवायला सुरुवात केली . मी जोरात त्यांना म्हणालो कि , ' माणूस मारून पडला असता तर आपण असेच त्याला फरफटत नेले असते काय ? तुम्हाला जमत नसेल तर मी त्याला उचलून ट्राक्टरमध्ये ठेवतो .' फार काही न बोलत त्यांनी उचलून त्याला ट्राक्टरमध्ये चढवले मी त्यांना सांगितले कि ह्या कुत्र्याला जंगलाच्या वाटेवर नेउन टाका . त्यांना आश्चर्य वाटले ! माझी हि धारणा होती कि जंगलात उघड्यावर पडल्यामुळे बाकीच्या मांसाहारी प्राण्यांना त्याचे मांस खाता येईल . हि माझी धारणा कुठवर बरोबर आहे मला कळत नाही . पण माझ्या या भूमिकेबद्दल मी त्यांना काहीच बोललो नाही . त्यांनी ट्राक्टर सुरु केला आणि ते निघून गेले .
                    गेल्या चार महिन्यांपासून या कुत्र्याला आम्ही खायला प्यायला घालत होतो . या कुत्र्याला मागच्या दोन पायांना लकवा मारला होता . मी जेव्हा पहिल्यांदा त्याला पाहिले तेव्हा त्याला जागचे हलताही येत नव्हते . यामुळे अन्नपाण्याशिवाय त्याच्या शरीराचा सापळा झाला होता . त्याला जोपर्यंत सक्षमपणे अन्न शोधायला जाण्याईतके चालता येणार नाही तोपर्यंत त्याला खायला घालायचे मी ठरवले . त्यानुसार रोज सकाळी व रात्री मी त्याला चपाती , भात , जेवणावळीतली मटणाची हाडे आणि पैसे नसतील तेव्हा बिस्किटे व पाव त्याला खायला घालत होतो . मग पाणी पाजत होतो . पाण्यासाठी इतका तहानलेला प्राणी मी दुसरा माझ्या आयुष्यात बघितला नाही . मी माझ्या बॅंगमध्ये त्याच्यासाठी पाणी, एक वाटी व खाण्याचे पदार्थ ठेवत होतो . पाणी आणि मिळणाऱ्या अन्नामुळे त्याला पुढच्या दोन पायांवर चालता येवू लागले होते . त्यामुळे आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतून हळूहळू स्टेंडच्या दिशेने आणि तिथून पुन्हा बाजारपेठ अशी त्याची हालचाल सुरु झाली होती . पुन्हा काही दिवसांनी त्याला मी पाठीमागच्या पायांच्या आधाराने चालण्याचा प्रयत्न करताना पाहिले  खूप आनंद झाला होता . लहान मुल जन्मल्यावर पहिल्यांदा पायाने चालू लागल्यावर त्याच्या  आई बाबांना जेव्हढा आनंद होतो अगदी तसाच ! त्याच्या हालचाली खुल्या झाल्या  होत्या , वेगावल्या होत्या ! माझ्या गाडीच्या किंवा माझ्या आवाजाच्या दिशेनं त्याची मान आता फिरू लागली होती . शेपटी हलवून ते आपला आनंद व्यक्त करू लागलं होतं . एकंदरीत माझ्या दिवसभराच्या जगण्याचा भाग हा प्राणी झाला होता . मी कुठूनही , कितीही कंटाळून आलो तरी त्याला पाणी आणि अन्न द्यायला जायचोच ! ( एक दोनदा केलेल्या कंटाळ्याचा मला आता पश्चाताप होत आहे . )
                 ह्या कुत्र्याला खायला घालताना बघून कित्येक लोक आश्चर्यमिश्रीत किंवा कुठल्या कुठल्या भावनेने बघत पुढे सरकायचे .मी कॉलेजला असताना बस स्थानकावर येणाऱ्या मनोरुग्णांना खायला द्यायची माझी इच्छा व्हायची पण लोक बघतील , ते काय म्हणतील ह्या विचाराने मी अवघडून जायचो . पण मी धाडसाने खायला देत गेलो आणि एक दिवस हे ' व्हाईट कॉलर्ड ' ' कससंच ' कुठच्या कुठे गळून गेलं कळलंच नाही !
           ह्या चार महिन्यांमध्ये आमचं त्या कुत्र्याला खायला देतेलं बघून कित्येक हात त्याला खायला देण्यासाठी पुढे आले . त्याच्या मरण्याने त्याला बिस्किटे घालणारा आणि आमच्याकडून ग्लासचे पैसे न घेणारा ललित खूप हळहळला ! कित्येकांना आम्ही करत असलेलं काम आमचा वेडेपणा वाटत होतं . सुरुवात मी केली होती पण त्याला खायला घालण्यासाठी माझ्या गैरहजेरीत दीपक कांबळे , बबलू शेख , शुभम यादव  , रेहान शेख , रवि कांबळे , मोहित घाटगे , स्वप्निल रांगणेकर , स्वरा महेश नार्वेकर , रोहित माद्यालकर इत्यादी मंडळी जाऊ लागली होती . मी माझ्या क्लासमध्ये माझे कित्येक  अनुभव मुलांना सांगितले  होते . अशा प्रकारच्या मदतीसाठी पुढे येताना 'लोक बघतील'  किंवा 'लोक काय म्हणतील' असे विचार मनात येतात . माझ्याही आले होते ! परंतु बघू देत ना लोक !' कुछ तो लोग कहेंगे …. ' हे गाणं मी सतत त्यांना सांगत असतो . आपण एका जीवाला खायला - प्यायला देतो आहोत याबद्दल आपल्याला लाज , संकोच न वाटता अभिमान वाटला पाहिजेत ! जे घालत नाहीत  त्यांना लाज वाटली पाहिजे . आपण  अशा घटनांमध्ये अभिमानानं मदत करायला हवी . जे लोक मनोरुग्ण किंवा अशा जखमी प्राणी,पक्षी,झाडे  यांना बघून सुद्धा न बघितल्यासारखं  करतात ते ढोंगी आहेत. त्यांना खायला  देणं  शक्य असूनसुद्धा 'स्टेटस' च्या बुरख्यात आपले अस्तित्व लपवतात.हि परात्मता माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करूच शकत नाहि !  या ढोंगी आणि बेगडी स्टेट्स साठी झटणारे कित्येक लोक आपल्या आसपास आहेत.त्यांचा बेगडीपणा मला माहित आहे तसा तो त्यांनाही माहित आहे .तरीही ते पांढ-या  कपड्यांत किंवा महागड्या गाड्यांत ' रुबाब ' मारण्याचा प्रयत्न करतात !
        मी गावाकडं जाताना ह्या कुत्र्याची जबाबदारी दिपकवर सोपवून जायचो ; आणि त्यानंही कधी ह्यात कंटाळा केला नाही . कधी कधी कित्येक विद्यार्थी मित्रांचे मला फोन यायचेत कि , ' सर , त्या कुत्र्याला खायला घातलंय कि मी खायला द्यायला जाऊ ?' अशा प्रकारचा फोन मला आल्यानंतर मला अतिशय आनंद व्हायचा . कारण ह्या सगळ्यांना आता अशा प्रकारे लोकांदेखत मदत करताना संकोचल्यागत वाटत नाही ; उलट आनंद होत आहे  !
        माझ्याशी संबंधित जवळपास सर्व लोकांना ह्या कुत्र्याबद्दल माहिती झाली होती . दत्ता पाटील ( पक्षी मित्र ) याने सांगितले होते कि , १५ दिवसांनंतर आल्यावर त्याच्यावर योग्य ते उपचार करूया . पण आता याला उशीर झालाय ……!
         मी झाडाच्या फांदीची तुलना माणसाच्या हाताशी करतो . मी जीवाचा , त्याच्या जीव प्रेरणेचा आदर करतो . ह्या चंगळवादी राहणीमानाने आम्ही सीमेपार बोकाळलो आहोत . आणि विशेष म्हणजे आम्हांला आमच्या असल्या जगण्याचा गर्व वाटतो . गाडी , बंगला , सोनं-नाणं , पांढरी कडक इस्त्रीची महागडी कपडे , पार्ट्या , जेवनावळी इत्यादी गोष्टींवर अमाप पैसा उधळणारे आपण भावनिक संवेदनांची उधळण करायला कंजुषी करतो ! प्रेमभंगात अमाप रडणारे लोक एखाद्या अपघातातल्या जखमीला वाचवण्यासाठीची अजिबात कृती करत नाहीत . ' रुबाब ' मारणार्यांकडून  कधीच स्थानाकावाराच्या ह्या कुत्र्यासाठी एखादी भाकरी किंवा बिस्किटचा पुडा आला नाही . ह्या बेगडी ' रुबाबा 'पेक्षा माझ्या शिकवणीतील मुलांची जाणीव अधिक व्यापक आणि निर्मितीक्षम वाटते मला ! त्यामुळे ह्या मुलांना आणि कुत्र्याला खायला अन्न देणारे तौसीफ , ललित इ . लोकांना सर्जनशील सलाम !
       एका जीवाचं मरण हि नैसर्गिक बाब आहे . परंतु अशा प्रकारे आम्ही जगवलेल्या जीवाचा अंत होणं माझ्यासाठी खूपच दु:खदायक आहे . हा मृत्यू नैसर्गिक नाही ………. !
 
------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                                                  अमित प्रभा वसंत
                                                                                                   ८००७४१५५६७